कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप संत मुलीधर महाराज यांनी फेटाळला

AVB NEWS गडचिरोली :
चपराळा येथील श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम ट्रस्टने उपस्थित केलेल्या विविध आक्षेपांवर श्री संत मुलीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान, हरनघाट (पारडी) संचालन समितीने आज शासकीय विश्रामगृह, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर खुलासा केला. समितीचे अध्यक्ष संत मुलीधर महाराज विठ्ठलवार गुज्जनवार यांनी कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा अथवा फोटोचा वापर करून देणग्या गोळा केल्याचा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला.
समितीने म्हटले की, कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा प्रसिद्धीसाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी कधीही वापर करण्यात आलेला नाही. तसेच पावती पुस्तकांवर कार्तिक स्वामी महाराजांचे छायाचित्र छापल्याचा आरोपही निराधार असून, त्याबाबत कोणताही पुरावा असल्यास तो सादर करावा, असे आव्हान करण्यात आले.
गुरू-शिष्य नात्याबाबत बोलताना संत मुलीधर महाराज यांनी सांगितले की, त्यांनी कार्तिक स्वामी महाराजांना गुरू मानले असून हिंदू धर्मपरंपरेनुसार कोणालाही गुरू मानण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या विषयावर आक्षेप घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
चपराळा ट्रस्टने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन असल्याचा दावा करत संचालन समितीने आपली भूमिका स्पष्ट केली. या खुलाशाच्या प्रती धर्मादाय आयुक्त, गडचिरोली, पोलीस निरीक्षक सावली आणि पोलीस निरीक्षक,आष्टी यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष लच्छय्या मलय्या गद्देवार, सचिव सुभाष आडकुजी नागुलवार, सहसचिव अनिल मंसाराम कांमडी, कोषाध्यक्ष मुकेश मनोहर गुरनुले तसेच सदस्य नरेंद्र डोप्पाजी जक्कुलवार, भालचंद्र केवलराम राखडे, प्रकाश मारोती पाल, अतुल शामराव भिरकुरवार, सुनिल तुकारामजी बोमनवार आणि हरिदास देवाजी आभारे उपस्थित होते.