कार्यकारी अभियंता साखरवाडे यांच्या हक्कालपट्टीसाठी उद्या ‘डफरे बजाओ’ आंदोलन * आंदोलनात मोठया संख्येने सहभागी होण्याचे अरविंदभाऊ कात्रटवार मित्र परिवाराचे आवाहन

AVB NEWS गडचिरोली :- येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे तसेच त्यांची गडचिरोली जिल्ह्यातून हक्कालपट्टी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात सोमवार 25 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम विभगााचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर ‘डफरे बजाओ’ आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अरविंदभाऊ कात्रटवार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर अंदाजे 5 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेला पुल रहदारी सुरू होण्यापुर्वी कोसळला. या पुल बांधकामाची पाहणी केली असता पुलाचे निकृष्ट काम करून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केला आहे. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी 2025 – 26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती व पुल दुरूस्तीच्या 50 कोटीच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला असून कामे न करताच बिले काढण्यात आली आहे. तसेच मागील 3 वर्षात तब्बल 5 हजार कामांच्या निविदा नियबाहय रित्या काढण्यात आल्या असून सदर कामे केवळ मजूर सहकारी सहकारी संस्थांना 20 टक्क्याने विकण्यात आल्याचा आरोपही कात्रटवार यांनी केला आहे.
गडचिरोली जिल्हयात रस्ते व पुलाची निकृष्ट कामे करून भ्रष्टाचाराचा कळस गाठणारे अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे आणि त्यांची गडचिरोली जिल्हयातून हक्कालपटी करण्यात यावी तसेच नाडेकल येथील कोसळलेल्या निकृष्ट पुल बांधकाम प्रकरणाची उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी आणि शासकीय निधीची वसुली करण्यात यावी या मागणीसाठी सोमवार 25 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर ‘डफरे बजाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला आहे.