बस अपघातातील जखमींची माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली तपासणी

AVB NEWs गडचिरोली: गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणाऱ्या एसटी बसला नवेगाव-मुरखळा परिसरात झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालयात माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. डॉ. उसेंडी हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी बहुतांशी रुग्णांना स्वतःच पाहणी केली आणि त्यांच्या उपचारांची माहिती घेतली.
रुग्णालयातील डॉक्टरांना सर्व जखमींवर तातडीने व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना डॉ. उसेंडी यांनी दिल्या. तसेच जखमींच्या नातेवाईकांना आश्वस्त केले की त्यांच्या उपचारासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
अपघातात तीन-चार लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये लहान बालकाचा देखील समावेश आहे. हा अपघात अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी आहे. मृत प्रवाशांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.
डॉ. उसेंडी यांनी रुग्णालयात उपस्थित गडचिरोली पोलिस आणि डॉक्टर्स यांचेकडून अपघाताची माहिती जाणून घेतली.यावेळी गडचिरोली नगरपरिषेदच्या नगराध्यक्षा प्रणोतीताई निंबोरकर, नगरसेवक सागर निंबोरकर, पंकज खोबे यासह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.