जिल्हा

शेतकरी आणि शेती बचाव साठी  १८ मे रोजी काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन  * आंदोलनात शेतकरी, नागरिकांनी  मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन

प्रस्तावित विमानतळाकरिता व MIDC करीता जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत, या मागणीसाठी करण्यात येणार धरणे आंदोलन

AVB NEWS गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विरोध होत असतानाही विविध एमआयडीसी प्रकल्प तसेच इतर कोणत्याही प्रकल्पाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळाकरिता गडचिरोली तालुक्यातील गुरुवाळा, हिरापूर व शिरपूर या गावांमध्ये शेतकऱ्यांनी विरोध करूनही बळजबरीने प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या विरोधाला सरकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे.

याच्या निषेधार्थ तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनी कोणत्याही प्रकल्पाकरिता अधिग्रहित करण्यात येऊ नयेत, या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने १८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

इतकेच नव्हे तर चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाकरिता १४ गावांतील शेतजमिनी अधिग्रहित करण्यात येणार होत्या. त्याकरिता स्थानिक शेतकऱ्यांनीही विरोध केला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः १४ गावांतील शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन कुणाच्याही शेतजमिनी एमआयडीसीकरिता घेण्यात येणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. असे असतानाही आता १४ गावांतील शेतजमिनींच्या खरेदी-विक्रीवर प्रशासनाने बंदी घातली असून, शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनी खरेदी अथवा विक्री करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागत आहे. अशा प्रकारे प्रशासन शेतकऱ्यांना दाबून ठेवण्याचे व त्यांच्या कुटुंबांत भांडणे लावण्याचे काम भाजप महायुती सरकारकडून होत आहे.

 

शेतकरी हा भारत देशाचा कणा आहे आणि शेती व माती वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून, या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधव, महिला भगिनी, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.