जिल्हा

नक्षलवाद्यांनी लोकशाही मार्ग स्विकारावा : गडचिरोलीत डाव्या पक्षांचे आवाहन

AVB NEWS गडचिरोली : भारत हा लोकशाहीवादी देश असून संविधानिक पध्दतीने चालत आलेला आहे. येथे बंदुकीच्या जोरावर सामान्य माणसाला न्याय मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे जंगलात उरलेल्या नक्षलवाद्यांनी बंदुकीचा मार्ग सोडून लोकशाही मार्ग स्विकारावा, असे आवाहन गडचिरोलीतील डाव्या पक्षांची केले आहे.

देशाच्या गृहविभागाने ३१ मार्च हा नक्षलवाद्यांसाठी शेवटचा अल्टीमेटम दिला होता. या पार्श्वभूमीवर काल एट्टापल्ली तालुक्याच्या संपर्क दौऱ्यावर असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ अमोल मारकवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव काॅ. सचिन मोतकुरवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील शेवटचा नक्षलवादी जयराम उर्फ नंदू मोंगे गावळे याच्या गिलनगुडा येथील घरी भेट देवून त्याचे वडील मोंगे गावळे यांच्याशी चर्चा केली. व जयरामने बंदुकीचा त्याग करून लोकशाहीचा मार्ग स्विकारावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऐंशी वर्षांपूर्वी स्थापन झालेला शेतकरी कामगार पक्ष आणि साठ वर्षांपूर्वी स्थापन झालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आजही देशातील सामान्य जनतेसाठी संसद, विधिमंडळ आणि रस्त्यावर सातत्याने लढत असून कोट्यवधी लोकांना त्यांचे घटनात्मक अधिकार मिळवून देवू शकले आहेत. रोजगार हमी, पेसा, वनाधिकारासारखे जनहिताचे कायदे डाव्या पक्षांनी लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाचे फलीत आहे. भारतात बंदुकीच्या जोरावर जनतेचे भले होण्याची कल्पना कपोलकल्पित ठरली आहे. त्यामुळे जंगलात उरलेल्या नक्षलवाद्यांनी बंदुकीचा त्याग करून लोकशाही प्रक्रियेत येवून शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली संसद, विधिमंडळ आणि रस्त्यावरचा संघर्ष करावा बंदुकीचा त्याग करून लोकशाही मार्गाने जनतेसाठी काम करु इच्छिणाऱ्यांचे आत्मसमर्पितांचे आम्ही आमच्या पक्षात स्वागत करु. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा नक्षलवादी आणि त्याच्या समर्थकांनी बंदुकीचा त्याग करावा असे आवाहनही भाई रामदास जराते, काॅ. अमोल मारकवार, काॅ. सचिन मोतकुरवार, काॅ. सुरज जक्कुलवार यांनी केले आहे.

जयरामने परत यावे : वडील मोंगे गावळे चे भावनिक आवाहन

घरकामाबद्दल रागावल्याच्या कारणावरून नंदू घर सोडून गेला आणि नक्षलदलम मध्ये भरती झाला. तेव्हापासून तो घरीच आला नाही. आता नक्षलवाद्यांचे सर्व मोठे नेते दलम सोडून गेले. अशा स्थितीत जंगलात राहण्यापेक्षा चळवळ सोडून नंदूने घरी परत यावे, असे भावनिक आवाहन जयराम उर्फ नंदू याचे वडील मोंगे गावळे यांनी नंदूला केले आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.