विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी भरारी..! * गोंडवाना विद्यापीठात लवकरच सुरू होणार निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

AVB NEWS गडचिरोली :- ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रशासकीय सेवेत जाण्याची स्वप्ने असतात; मात्र योग्य मार्गदर्शन आणि साधनसुविधांच्या अभावामुळे ही स्वप्ने अनेकदा अपुरीच राहतात. अशा स्वप्नांना आता नवी उमेद आणि नवे पंख देण्याचा संकल्प गोंडवाना विद्यापीठाने केला आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करत विद्यापीठात लवकरच ‘निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ सुरू होणार आहे. या बाबतचा ठराव अधिसभा सदस्य संजय रामगिरवार आणि धर्मेंद्र मुनघाटे यांनी अधिसभेत मांडला होता. सदर ठराव मंजूर झाला असून अधिसभा समितीच्या शिफारशीना व्यवस्थापन परिषदेने मंजूरी दिली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू होण्याचा मार्ग सुकर झालाय .
एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या कठीण तसेच प्रतिष्ठित परीक्षांच्या वाटेवर चालताना विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या प्रवासात योग्य दिशा देणारा हात आणि अभ्यासाचे सुयोग्य मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात सुरू होणारे हे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.
या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यास पद्धती, सराव चाचण्या आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेले सर्व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात नवी उमेद जागेल, त्यांच्या स्वप्नांना दिशा मिळेल आणि आत्मविश्वासाने यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे बळ मिळेल.
हा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवे पर्व घडविणारा ठरेल. गोंडवाना विद्यापीठाचा हा प्रयत्न म्हणजे केवळ एक शैक्षणिक उपक्रम नसून, तरुणांच्या स्वप्नांना साकार करण्याचा आणि त्यांच्या भवितव्याला उज्ज्वल दिशा देण्याचा एक आशादायी संकल्प असल्याची भावना व्यक्त होत आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी स्वतंत्र कक्ष सुरू होत असून या केंद्राचे समन्वयक म्हणून डॉ. वैभव मसराम काम पाहत आहेत .
कशी होणार विद्यार्थ्यांची निवड
या निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड Entrance Exam द्वारे होणार आहे. तसेच विद्यार्थी हा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयाचा असावा.
गोंडवाना विद्यापीठाच्या बजेटमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी 100 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. जेणेकरून विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व इतर लागणारी संसाधने उपलब्ध करून दिल्या जाईल.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात असलेल्या सुविधा
विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय, शांत वाचन कक्ष आणि आवश्यक संदर्भ पुस्तके तसेच, चालू घडामोडींचे अद्ययावत साहित्य, दैनिक वर्तमानपत्रे आणि मासिके यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होईल. यासोबतच अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित टेस्ट सिरीज, उत्तरलेखन सराव आणि शंका निरसन सत्रे, डिजिटल बोर्ड, अद्ययावत क्लासरूम यांसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.पुण्यातील प्रतिष्ठित कंपनीला काम देण्यात आले असून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा स्वतंत्र कक्ष लवकरच अस्तित्वात येईल.