नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरवासीयांना तब्बल १० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प! * सामाजिक कार्यकर्ते एजाज शेख यांचा गंभीर आरोप
AVB NEWS गडचिरोली :- शहरातील नागरिक गेल्या १० दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असताना नगराध्यक्षा आणि पाणीपुरवठा सभापती मात्र गोसीखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करत असल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीवरून दिसून येत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते एजाज शेख यांनी केला आहे.
शहरवासीयांना १० दिवसांपासून पाणी उपलब्ध करून देता आले नाही. नगर परिषद प्रशासनाच्या माहितीनुसार, ३ जून रोजी गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात येणार असून ५ जूनपर्यंत शहरात पाणीपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना प्रत्यक्ष पाणी मिळण्यापूर्वीच प्रसिद्धी करण्याची एवढी घाई का, असा सवाल एजाज शेख यांनी उपस्थित केला आहे.
“जनतेला पाणी मिळाल्यानंतर प्रसिद्धी करा; आधी श्रेय घेण्याची घाई कशासाठी?”
नदीतील पाण्याची पातळी सातत्याने घटत असताना नगर परिषद पदाधिकारी व प्रशासनाने वेळेत योग्य नियोजन आणि आवश्यक उपाययोजना केल्या असत्या, तर शहरवासीयांवर ही वेळ आली नसती. मात्र, कामापेक्षा प्रसिद्धीला अधिक महत्त्व देण्याच्या प्रवृत्तीमुळेच आज नागरिकांना भीषण उष्णतेत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असा घणाघाती आरोप एजाज शेख यांनी केला.